
झारखंडमधील हजारीबागच्या झेंडा चौकात रामनवमीपूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गाणी वाजवण्यावरून मंगळवारी रात्री उशिरा जामा मशिदीजवळ दगडफेक झाली. त्यामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दगडफेकीनंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी लाठीमार केला आणि जमावाला पांगवण्यासाठी हवेत चार राउंड गोळीबारही केला. 6 एप्रिल रोजी राम नवमी असल्याने शेकडो आखाड्यांनी दर मंगळवारी मंगल मिरवणूक काढायला सुरुवात केली आहे. परंपरेनुसार दरवर्षी होळीपासून राम नवमी उत्सवापर्यंत दर आठवड्याला ही मिरवणूक काढली जाते. दरम्यान, सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. काही दिवसांनी राम नवमी आहे त्यामुळे सलोखो राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.