
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन 30 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी होऊन महाकुंभ मेळय़ाला निघालेल्या 15 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक प्रवासी रेल्वेखाली येऊन कापले गेले. प्लॅटफॉर्म आणि जिन्यावर कपडे, चपला, सामानाचा खच पडला होता.
दोन ट्रेन रद्द झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 आणि 16 वर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. जिन्यांवरही गर्दी झाली. प्रचंड रेटारेटीमुळे अनेक प्रवाशी जिन्यावरून थेट फलाटावर कोसळले. अनेक प्रवाशी रेल्वेखाली आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जिकडे तिकडे किंकाळ्या, आरडाओरडा आणि आक्रोश असे चित्र होते. या दुर्घटनेमुळे सरकारचे ढिसाळ व्यवस्थापन पुन्हा एकदा समोर आले आहे.
अनेक प्रवाशी गुदरमल्यामुळे बेशुद्ध पडले. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या आणि जखमींना नजिकच्या लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्वतंत्रता सेनानी एक्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी उशीराने धावत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 12,13 आणि 14 वर प्रवाशांची गर्दी उसळली. याचदरम्यान प्रयागराज ट्रेनने जाणारे आणखी प्रवासी रेल्वे स्थानकात पोहोचले. त्यामुळे गर्दी उसळली.
कुंभमेळ्यात चौथ्यांदा अग्नितांडव… भाविकांमध्ये घबराट, पळापळ
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात शनिवारी पुन्हा एकदा आगीचा भडका उडाला. सेक्टर-18 आणि 19 दरम्यान असलेल्या श्रीरामचरित मानस सेवा प्रवचन मंडळाच्या मंडपांमध्ये ही आग लागली. त्यामुळे पळापळ झाली, घबराट पसरली. गर्दीला हटवून आग तासाभरात नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत नोटा भरलेल्या तीन बॅगा जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.