लग्न समारंभात हर्ष फायरिंग करणे महागात पडले, 6 वर्षाच्या चिमुकल्याचा गोळी लागून मृत्यू

लग्न समारंभाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. लग्नात हर्ष फायरिंग करताना सहा वर्षाच्या मुलाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री बिहारच्या उदवंतनगर परिसरात ही घटना घडली.

शेजाऱ्याच्या मुलीच्या लग्नात पीडित परिवार सहभागी झाला होता. यावेळी वरमाला घालताना हर्ष फायरिंग करण्यात आली. यावेळी सहा वर्षाच्या आशिष कुमारच्या डोक्यात गोळी लागली. जखमी बालकाला पटणा येथे रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृत बालकाचे नातवाईक संतापले आणि त्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून चक्काजाम केला. टायर जाळत, घोषणाबाजी करत आरोपींना पकडण्याची मागणी नातेवाईकांनी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केले. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.