ओव्हरटेकच्या नादात ट्रकमधील सळ्या रिक्षाला धडकल्या, 7 जणांचा मृत्यू; 6 जखमी

ओव्हरटेक करताना ट्रकमधील लोखंडी सळ्या खाली पडून रिक्षाला धडकल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. तेलंगणातील वारंगल-मामुनुरु रोडवर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅक बांधकामासाठी लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक दोन रिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकमधील सळ्या खाली पडल्या. या सळ्या रिक्षांना जाऊन धडकल्या आणि अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.