सध्या उत्तर प्रदेशातील संभलचा मुद्दा देशभरात गाजत आहे. तेथील एका मशीदीच्या परिसारतील विहीरीत काही मूर्ती सापडल्या आहेत. कुठे ना कुठे एखाद्या मशिदीखालून किंवा दर्ग्याच्याखालून मूर्ती सापडत आहेत. त्यानंतर लगेचच काही हिंदू नेते त्या मशीद किंवा दर्ग्याचे उत्खनन करून घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यावर न्यायालयही ऑर्डर देतं. यानंतर विहिरींमध्ये मंदिराचा ढिगारा किंवा मूर्ती पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. अशा घटनांमुळे वातावरण बिघडतं. सध्या उत्तर प्रदेशात सध्या असंच वातावरण आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान करत चांगलेच कान टोचले आहेत.
अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करत शांतता प्रस्थापित करत परिस्थितीवर अंकुश ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे. मात्र, ते बघ्याची भूमिका घेत गप्प असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. उठसूट मशिदीखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? काही हिंदू नेत्यांच्या अशा कृतीने देशाची बदनामी होत असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते. काही स्वयंघोषित हिंदूंनी अनावश्यक हिंदू-मुस्लिम संघर्ष निर्माण करणे टाळावे. हिंदू परंपरेने उदार आणि सहिष्णू आहेत. आपल्या या परंपरेला धक्का पोहोचेल असा कोणताही वाद निर्माण करणं आपण आता टाळलं पाहिजे, असे ते म्हणाले. जगभरात हिंदूंना आपली सद्भावनेची प्रतिमा कायम ठेवली पाहिजे, त्यामुळे संयम राखणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केलं आहे..
आता राममंदिराची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आता मंदिर-मशिदीवरून कोणताही वाद उभा करण्याची गरज नाही. आपण एकत्र , एकदिलाने राहू शकतो, हे देशाने दाखवून देण्याची वेळ आहे. अलीकडे अनेक मशिदींखाली मंदिरांचे अवशेष सापडल्याचे म्हटले जात आहे, त्यासाठी काही लोक न्यायालयातही जातात. ते न्यायालयातही याचिका दाखल करतात. पण असे करणे अस्वीकार्य असल्याचे सरसंघचालकांनी स्पष्ट केलं.