‘योगी जी को ठोक दो’ दिल्लीतून आला संदेश; रणदीपसिंग सुरजेवाला यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा सपाटून पराभव झाला. या पराभवाचे खापर भाजपमधील नेते एकमेकांवर फोडत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात सर्व आलबोल नसल्याचे दिसत आहे. तसेच भाजपमध्ये आता अंतर्गत कलह आणि वादविवाद वाढत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी दिल्लीत बोलावून ‘योगी जी को ठोक दो’ असा संदेश देण्यात आला आहे, असा मोठा दावा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी दिल्लीत बोलावून ‘योगी जी को ठोक दो’ असा संदेश देण्यात आला आहे. मात्र, हा संदेश नरेद्र मोदी, अमित शहा की जे.पी. नड्डा यांनी दिला आहे, याबाबत आपल्याला माहिती नाही, असेही सुरजेवाला यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने उत्तर प्रदेशात भाजपमधील कलह वाढला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना हटवा, असा मतप्रवाह त्यांच्याच पक्षात आहे.

भाजपमध्ये काय सुरू आहे, त्याच्याशी आम्हाला देणे-घेणे नाही. मात्र, भाजपमध्येच आता बुलडोझर वॉर सुरू आहे. एक नेता दुसऱ्यावर बुलडोझर चढवतो. दिल्लीतून त्या नेत्यावर बुलडोझर चढवण्यात येतो. हा त्यांचा पक्षातंर्गत विषय आहे. मात्र, भाजपच्या या अंतर्गत वादात उत्तर प्रदेशमधील जनता भरडली जात आहे. त्यामुळे राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. जनतेच्या समस्येकडे लक्ष देण्यात येत नाही. आम्ही इंडिया आघाडी जनतेच्या समस्यांसाठी आवड उठवत मुकाबला करत राहणार आहोत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांचा दावा खरा ठरणार…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्यासाठी भाजपने पूर्ण प्लॅनिंग केलं आहे आणि ते तुम्हाला लवकरच दिसेल, असा दावा आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. ते म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाबाबत मोठा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर योगी अदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवतील, असा दावा केजरीवाल यांनी केला होता. आता घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे केजरीवाल यांचा दावा सत्यात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.