
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी एक खाजगी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक महिला प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत माहिती देताना मेहसाणा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक डीजी बडवा यांनी सांगितले की, काही तांत्रिक कारणांमुळे मेहसाणा शहराजवळील उचरपी गावात एका मोकळ्या मैदानात खासगी विमान कोसळले.
त्यांनी सांगितलं की, “मेहसाणा विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर उचार्पी येथील एका शेतात हे विमान कोसळले, ज्यामध्ये एक महिला प्रशिक्षणार्थी पायलट होती. या अपघातात प्रशिक्षणार्थी पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची अधिक चौकशी करण्यासाठी विमान वाहतूक अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.”