केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणूक प्रकरणी कारवाई

केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यावर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्र्यांच्या भावाला फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतची चर्चा होत आहे. फसवणुकीच्या एका प्रकरणात केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ गोपाळ जोशी याला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. जोशी याने दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जनता दल (एस) पक्षाच्या माजी आमदाराच्या पत्नीने पोलिसांकडे केली होती.

माजी आमदार देवानंद फुलसिंह चव्हाण यांच्या पत्नी सुनिता चव्हाण यांनी गोपाळ जोशी व इतरांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपची उमेदवारी मिळवून देतो असे सांगून माझ्याकडून गोपाळ जोशी याने 2 कोटी रुपये उकळले होते, असे चव्हाण यांनी या तक्रारीत म्हटले होते. या कारवाईनंतर आपण तीन दशकांपेक्षा जास्त काळापूर्वीच आपला भाऊ गोपाळ जोशी यांच्याशी संबंध तोडल्याचे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.