आसामला निघालेले पोलीस गूगल मॅपमुळे नागालँडमध्ये पोहोचले, नागरिकांनी गुन्हेगार टोळी समजून चोपले

गूगल मॅपमुळे अपघाताच्या घटना घडल्याच्या रस्ता चुकल्याच्या अनेक घटना सामान्य नागरिकांसोबत घडल्या आहेत. मात्र गूगल मॅपने चक्का पोलिसांनाच चकवले आणि आसाममध्ये छापेमारी करायला निघालेले पोलीस नागालँडमध्ये पोहचले. सिव्हिल ड्रेस आणि हातातील शस्त्र पाहून नागरिकांनी गुन्हेगार टोळी समजून चांगलेच चोपले. यानंतर रात्रभर पोलिसांना ओलीस ठेवले.

मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या जोरहट पोलिसांचे 16 सदस्यीय पथक एका आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी करण्यासाठी गेले होते. इच्छित स्थळी पोहचण्यासाठी त्यांनी गूगल मॅपची मदत घेतली. मात्र गुगल मॅप्सने पोलीस पथकाला नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात पोहोचवले.

पोलिसांना सिव्हिल ड्रेसमध्ये आणि त्यांच्याकडील अत्याधुनिक शस्त्रे पाहून मोकोकचुंगमधील स्थानिक लोकांनी त्यांना एखादी गुन्हेगार गँग समजून चोपले. यानंतर नागरिकांनी त्यांना रात्रभर ओलीस ठेवले. यात एक पोलीस जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच जोरहट पोलिसांनी मोकोकचुंगच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मोकोकचुंग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आसाम पोलिसांची सुटका केली.