कामाख्या एक्स्प्रेस घसरली, एकाचा मृत्यू, 8 जखमी

बालासोर येथील घटना ताजी असतानाच ओदिशात पुन्हा एकदा रेल्वे अपघात घडला. बंगळुरू ते आसामला जाणाऱ्या कामाख्या एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचचे 19 डबे चौद्वार परिसरातील मांगुली पॅसेंजर थांब्याजवळ रुळावरून घसरले आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रचंड आरडाओरड करत अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. या अपघातात एकाचा मृत्यू तर आठ प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे.

अपघातानंतर नीलाचल एक्स्प्रेस, धौली एक्स्प्रेस, परुलिया एक्स्प्रेसचे मार्ग वळवण्यात आले. घटनेबाबत कळताच एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर रेल्वे प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. रेल्वे रुळाशेजारी मदतीची वाट पाहत बसलेल्या अनेक प्रवाशांना उन्हाचा तडाखा बसला. एकूण 15 प्रवाशांवर प्रथमोपचार करण्यात आल्याचे कटकचे जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे म्हणाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सात प्रवाशांना कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोदी सरकारच्या 295 दिवसांत 22 मृत्यू

मोदी सरकारच्या 295 दिवसांच्या कार्यकाळात 91 रेल्वे अपघात झाले असून 158 जखमी आणि 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे काँग्रेसने एक्सवरून म्हटले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रवासी असुरक्षित असून, रेल्वे अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. रेल्वेमंत्री केवळ रील बनवण्यात व्यस्त आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.