![hyderabad murder](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/hyderabad-murder-696x447.jpg)
संपत्तीच्या वादातून हैदराबादमधील प्रसिद्ध उद्योगपती वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अध्यक्षाची नातवानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. बचावासाठी मधे पडलेली आईही यात जखमी झाली आहे. व्ही.सी. जनार्दन राव असे 86 वर्षीय मयत उद्योगपतीचे नाव आहे. राव यांच्यावर 70 हून वार करण्यात आले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. किर्ती तेजा असे आरोपीचे नाव आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
किर्ती तेजा हा अमेरिकेहून शिक्षण पूर्ण करून घरी परतला होता. तेजाचा आजोबांसोबत संपत्तीवरून वाद सुरू होता. तेजा आपल्या आईसोबत गुरुवारी आजोबांच्या घरी आला. त्याची आई किचनमध्ये कॉफी बनवायला गेल्यानंतर त्याचा आजोबांसोबत संपत्तीवरून वाद झाला.
वाद टोकाला गेला. यानंतर तेजाने आजोबांवर चाकूने 70 हून अधिक वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी तेजाची आई सासऱ्यांच्या बचावासाठी मधे पडली असता आरोपीने तिच्यावरही चाकूहल्ला केला.
आजोबा लहानपणापासून आपल्याशी चांगला व्यवहार करत नव्हते. तसेच संपत्तीची वाटणीही करत नव्हते, असा तेजाचा आरोप आहे. याच रागातून ही हत्या घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.