
सोने प्रति तोळा एक लाख रुपयांवर गेल्याने सोन्याने नवा उच्चांक गाठला असताना आता सोने तब्बल 35 टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेतील एका प्रसिद्ध विश्लेषक संस्थेने सोन्याचे दर प्रति तोळा 55 हजारांपर्यंत घसरतील, असा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय बाजारपेठेत 90 हजार रुपये प्रति तोळा असलेली 24 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 55 हजार रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत हेच दर सध्या तीन हजार डॉलर प्रतितोळ्यावरून थेट 1 हजार 820 डॉलर प्रति तोळ्यापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील विश्लेषक ‘मार्निंगस्टार’ या संस्थेचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.
पुरवठा वाढल्याने मागणीत घट
जगभरातील आर्थिक अनिश्चितता आणि महागाई यामुळे तसेच भू-राजकीय तणाव, व्यापारयुद्ध इत्यादी कारणांमुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडून सोन्याकडे वळले होते. त्यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, मात्र आता सोन्याचा पुरवठा वाढल्याने मागणीत घट झाली असल्याचे ‘मार्निंगस्टार’ या अर्थविश्लेषक संस्थेने म्हटले आहे.