ग्राहकांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव

सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचे दर 1350 रुपयांनी घसरून 93000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही 5 हजार रुपयांची घसरण झाली असून गेल्या चार महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे.

विश्लेषकांच्या मते, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ धोरण लागू केल्यानंतर, सोन्याच्या गुंतवणुकीत घट झाली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या जागतिक व्यापार धोरण आणि अर्थव्यवस्थेवर आहे, यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. “गुंतवणूकदार आता जागतिक व्यापार धोरणांचा आणि संभाव्य आर्थिक मंदीचा परिणाम पाहत आहेत. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे”, असे अबन्स फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ चिंतन मेहता यांनी सांगितले.

चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण

चांदीच्या किमतीतही 5 हजार रुपयांची घसरण झाली असून प्रति किलो 95 हजार रुपयांवर आली आहे. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. जागतिक पातळीवर, स्पॉट सोन्याचा भाव 21.74 डॉलर्स किंवा 0.70 टक्क्यांनी घसरून 3,093.60 डॉलर्स प्रति औंस झाला. आशियाई बाजारात, स्पॉट चांदीचा भाव 1.69 टक्क्यांनी घसरून 31.32 डॉलर प्रति औंस झाला.