
सरावादरम्यान 270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडल्याने सुवर्णपदक विजेत्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश्तीका आचार्य असे 17 वर्षीय मयत खेळाडूचे नाव आहे. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात ही घटना घडली. यश्तीकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश्तीका बुधवारी जिममध्ये ट्रेनरच्या देखरेखीखाली सराव करत होती. यावेळी 270 किलोचा रॉड उचलताना तिचा तोल गेला आणि रॉड तिच्या मानेवर पडला. यामुळे तिच्या मानेचे हाड मोडले.
यश्तीकाला तात्काळ आचार्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या अपघातात ट्रेनरलाही किरकोळ दुखापत झाली आहे. यश्तीकाच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिली नाही. शवविच्छेदनानंतर यश्तीकाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.