![himachal traicker death](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/himachal-traicker-death-696x447.jpg)
हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात त्रिउंडमध्ये ट्रेकिंगसाठी आलेल्या परदेशी ट्रेकरचा दरीत कोसळून मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार जखमी झाला असून त्याच्यावर धर्मशाळा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हावर्ड थॉमस हैरी असे मयत ट्रेकरचे तर रॉबर्ट जॉन एमर्टन असे जखमी ट्रेकरचे नाव आहे. दोघेही ब्रिटेनचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पर्यटन व्हिसा घेऊन हिंदुस्थानात फिरायला आले होते. दोघेही त्रिउंड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंगदरम्यान दोघेही दरीत कोसळले. यात दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांना दरीतून बाहेर काढले.
दोघांना उपचारासाठी धर्मशाळा येथे नेत असताना हावर्ड हैरी याचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्याच्या साथीदारावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.