![ragging-q](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/02/ragging-q-696x447.jpg)
केरळमधील नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंगचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पाच सिनिअर विद्यार्थ्यांनी तीन ज्युनिअर्सची रॅगिंग करत अमानुष छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितांच्या तक्रारीनंतर कोट्टायम गांधीनगर पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
सॅम्युअल जॉन्सन (20), जीवा एनएस (19), राहुल राज केपी (22), रिजिलजीत सी (21) आणि विवेक एनव्ही (21) अशी आरोपीची नावे आहेत. हे सर्वजण नर्सिंगच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 पासून सिनिअर त्यांचा छळ करत होते. आरोपी सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर्सना नग्न करायचे, त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर डंबेल्स ठेवायचे. तसेच कंपास किंवा इतर तीक्ष्ण वस्तूने त्यांना जखमी करायचे. याशिवाय शनिवार, रविवारी दारूसाठी पीडितांकडून पैसे उकळायचे.
सोमवारी एका ज्युनिअरने दारुसाठी पैसे न दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर पीडिताने पालकांना याबाबत सांगितले. पालकांच्या सल्ल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. महाविद्यालयाने आरोपी विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. पोलिसांनी रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांना अटक केली आहे.