
महाशिवरात्री उत्सवात सहभागी होण्यासाठी चाललेल्या भाविकांवर हत्तींच्या कळपाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी पहाटे आंध्र प्रदेशात घडली. हत्तींच्या हल्ल्यात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. सर्वजण अन्नमय्या जिल्ह्यातील तालाकोना मंदिरात चालले होते.
सर्व भाविक रेल्वे कोडुरु मंडळातील उरलगद्दापाडू गावातील रहिवासी होते. महाशिवरात्री उत्सवासाठी शेषचलम जंगलातून चालत सर्वजण तालाकोना मंदिरात चालले होते. यादरम्यान हत्तींच्या एका कळपाने भाविकांवर हल्ला केला. भाविकांची जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ सुरू झाली. मात्र या हल्ल्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.