जम्मू-काश्मीरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू

काश्मीर खोऱ्यात गेल्या 40 दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरू आहे. यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही आहेत. ही थंडी एका कुटुंबाच्या जीवावर बेतली आहे. रविवारी पंद्रेथान भागात एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि तीन मुलांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

मूळचे बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील रहिवासी असलेले हे कुटुंब पंद्रेथान येथे भाड्याने राहत होते. रविवारी दिवसभर मयत कुटुंबाची काहीच हालचाल जाणवली नाही. यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घरात जाऊन पाहिले असता सर्व कुटुंबीय बेशुद्धावस्थेत आढळून आले. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

श्वास गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

हिवाळ्यात गॅस हिटर आणि कोळशावर चालणारी उपकरणे वापरल्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो. परिणामी गुदमरून मृत्यू होतात. हवामान खात्याने येत्या 24 तासांत काश्मीर प्रदेशात आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी ज्वलनशील साधने वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.