देशभरात सध्या संभलचा विषय चर्चेत आहे. आता संभल जिल्ह्यातील दीपसरायजवळ असलेल्या खग्गू सराय भागात चार दशकांपासून बंद असलेले मंदिर शनिवारी प्रशासनाने उघडले. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. पूजा-अर्चना सुरु करण्यात आली. प्रशासनाने मंदिराजवळ असलेल्या विहिरीचे खोदकाम सुरु केले आहे. विहिरीच्या खोदकामादरम्यान आतापर्यंत तीन मूर्ती सापडल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
संभल जिल्ह्यात वीज चोरीची तपासणी करताना प्राचीन हिंदू मंदिरात जुने अवशेष आणि मूर्ती सापडल्या आहेत. वीजचोरीबाबत कारवाई करण्यात आली. तसेच प्रशासनाने मंदिराच्या जवळपास असणारे अतिक्रमण हटवले आहे. तसेच 46 वर्षे बंद असलेले मंदिर उघडण्यात आले आहे. मंदिरात असलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर पूजापाठ सुरु करण्यात आले.
या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले. त्यात शिवलिंग, हनुमानजीची मूर्ती मिळाली. तसेच मंदिर परिसरात एक विहीरसुद्धा आढळली. प्रशासनाने विहिरीत खोदकाम सुरु केले. त्यात माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्या मूर्ती सापडल्या. या मूर्ती ताब्यात घेण्यात आल्या असून त्या प्रशासनाकडे सोपवण्यात आल्या आहेत.
संभलमधील या भागात पूर्वी हिंदूंची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. याबाबत स्थानिकांनी सांगितले की, या भागातील कार्तिक शंकर मंदिर हे आमचे श्रद्धास्थान आहे. आमच्या पूर्वजांनी या मंदिराची निर्मिती केली होती. सकाळी, संध्याकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी येते होते. भजन-कीर्तन होत होते. 1978 मध्ये या भागात दंगल झाली. त्यानंतर या भागातील हिंदूंना हा परिसर सोडला. मंदिराच्या चारही बाजूंनी मुस्लिम लोकांची संख्या जास्त होती. त्यामुळे मंदिरात पुजा-अर्चना बंद झाली. आता पुन्हा मंदिर उघडण्यात आले असून पूजा अर्चना सुरू करण्यात आली आहे, त्याचे समाधान असल्याचेही नागरिकांनी सांगितले.