माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात शनिवारी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. चावला यांच्यावर सायंकाळी 5 वाजता ग्रीन पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी एक्सवर पोस्ट करत चावला यांच्या निधनाची बातमी दिली.
नवीन चावला यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रियेसाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
नवीन चावला 1969 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत सामील झाले. त्यांनी दिल्ली, गोवा, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप सरकारांमध्ये तसेच कामगार, गृह आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयात काम केले आहे. त्यानंतर चावला यांची 2005 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. एप्रिल 2009 मध्ये त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.