तेलंगणात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यात माजी सैनिकाने पत्नीची हत्या केली. मग मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळून तलावात फेकल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. त्याने पत्नीची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. गुरू मूर्ती असे आरोपी पतीचे नाव आहे.
गुरू सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो कांचन बागेत डीआरडीओमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. गुरु आणि मयत वेंकट माधवी यांचा 13 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत.
गुरूने 18 जानेवारी रोजी माधवीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळले आणि जिलेलागुडा येथील तलावात फेकले. यानंतर गुरु मीरपेट पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
गुरुच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी बेपत्ता माधवीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना गुरुवर संशय आल्याने त्यांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीत गुरुने गुन्ह्याची कबुली देत धक्कदायक माहिती दिली.
पोलिसांनी गुरुचा जबाब नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस तलावात मृतदेहाच्या अवयवांचा शोध घेत आहेत. हत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे.