मोहरीच्या तेलावरून पती-पत्नीचा वाद विकोपाला; थेट घटस्फोटापर्यंत प्रकरण गेले

हल्ली जोडप्यांमध्ये कोणत्या कारणावरून वाद होईल आणि घटस्फोट घेतील याचा नेम नाही. असेच एक अजब प्रकरण आग्र्यात उघडकीस आले आहे. मोहरीच्या तेलावरून पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला. हा वाद घटस्फोटापर्यंत पोहचला. मात्र कुटुंब समुपदेशकाच्या मध्यस्थीने अखेर यावर तोडगा निघाला.

आग्रा येथील या जोडप्याचे 2020 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर तीन वर्ष सर्व सुरळीत सुरू होतं. मात्र गेल्या वर्षीपासून दोघांमध्ये वाद सुरू झाले. पती पत्नीला खर्चासाठी पैसे देत नव्हता. अखेर पत्नीने यावर तोडगा शोधला.

पतीची मोहरीची शेती आहे. पत्नी घरातील मोहरीचे तेल माहेरी जाऊन विकायची आणि खर्चासाठी पैसे मिळवायची. पतीला ही बाब कळल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. अखेर हे भांडण विकोपाला गेले. पत्नी पतीचे घर सोडून माहेरी रहायला गेली.

पत्नीने पतिवरोधात पोलीस तक्रार दाखल केली. यानंतर प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग करण्यात आले. पती-पत्नीचे समुपदेशन करत अखेर हा वाद मिटवण्यात आला.