
मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यातच परिवहन विभागाचे माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत असल्याचं सभागृहात पाहायला मिळत आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवशी विरोधी पक्षनेते उमंग सिंघर विधिमंडळ पक्षासह सोन्याची प्रतीकात्मक विटा घेऊन सभागृहात पोहोचले. त्यांनी येथील गांधी पुतळ्याजवळ निदर्शनेही केली. याप्रकरणी तपास करण्याची विरोधी पक्षाने मागणी केली आहे.
भाजप सरकार भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर मौन बाळगत आहे आणि आरटीओ घोटाळ्याच्या प्रकरणावर चर्चा टाळत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते उमंग सिंघर यांनी केला आहे. मध्य प्रदेशचे भाजप सरकार हे प्रकरण दाबत आहे, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेस आमदारांनी आज हातात फलक घेऊन सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. प्रतीकात्मक सोन्याच्या विटा हातात घेऊन आणि फलक दाखवत आमदारांनी घोषणाबाजी केली आणि विचारले की, या सोन्याच्या विटा कोणाच्या आहेत? त्याची चौकशी करा. मध्य प्रदेश सरकारला सर्वात भ्रष्ट सरकार म्हणत काँग्रेस आमदार म्हणाले की, देशातील आणि राज्यातील लोकांची अवस्था सांगाड्यांसारखी होत चालली आहे. 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपये कोणाचे आहेत? मध्य प्रदेश सरकार भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या कारमधून ईडीने 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त केली होती. सध्या तो फरार आहे. हे सोनं आणि रोकड कोणाची आहे? याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे.