लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नाही; प्रकृती स्थिर असल्याची माहिती

माजी उप पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात लालकृष्ण आडवाणी यांना दाखल करण्यात आले आहे. शनिवारी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपोलो रुग्णालयातील आयसीयुत त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मात्र, त्यांची प्रकृती नाजूक असली तरी स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ न्युरोलॉजिस्ट डॉ. विनीत सूरी यांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लालकृष्ण आडवाणी 97 वर्षांचे आहेत. गेल्या 4 ते 5 महिन्यात ते चौथ्यांदा आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी त्यांना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल केले होते. लालकृष्ण आडवाणी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाणे बंद केले होते. ते घरीच आराम करीत होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक नेत्यांनी भेट देत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.