दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. तो न्यायालयीन कोठडीत असून तिहार तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घटनाक्रमानंतर आपचे संजय सिंह संतप्त झाले असून मोदी सरकारला तिहार जेलचे गॅस चेंबर करायचे आहे काय, असा थेट सवाल केला आहे.
भाजप हा सर्वात भ्रष्टाचारी पक्ष असून या भ्रष्टाचारी पक्षाचे नेते आता केजरीवाल यांना नैतिकता शिकवणार आहेत का, केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला लाथ मारली होती. आयआरएस सनदी अधिकाऱ्याची नोकरी सोडली होती. अशा व्यक्तीला तुम्ही काय नैतिकता शिकवणार. केजरीवाल हे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, प्रश्न नैतकतेचा नसून देशातील लोकशाही वाचवण्याचा आहे. नैतिकतेचा प्रश्न असेल तर मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. तसेच इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेते निवडून दबावतंत्राने त्यांना स्वतःच्या पक्षात घेणाऱ्यांनी नैतिकता शिकवू नये. केजरीवाल यांनी राजीनामा दिला तर आप पक्ष संपवण्यात येईल. दिल्ली, पंजाब येथील नेत्यांना तुरुंगात डांबण्यात येईल. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यासारख्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, मोदी सरकारला तिहार तुरुंगाचे गॅस चेंबर करायचे आहे काय, असा संतप्त सवालही सिंह यांनी केला.