
अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे अवयवदान करत लष्कराच्या जवानाने सहा रुग्णांना जीवदान देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. महार रेजिमेंटच्या 10 व्या बटालियनचे सेवारत नॉन-कमिशनर ऑफिसर हवालदार नरेश कुमार यांच्या 18 वर्षीय मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
कुमार यांचा मुलगा अर्शदीप सिंग याचा 8 फेब्रुवारी रोजी अपघात झाला. यात त्याचा अर्शदीपचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर नरेश कुमार यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
मुलाच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी 16 फेब्रुवारी रोजी अर्शदीपचे यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि कॉर्निया दान करण्यात आला. यकृत आणि मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉरद्वारे नवी दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरलमध्ये नेण्यात आले. तर स्वादुपिंड दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णाला दान करण्यात आले. दरम्यान, गरजूंना दृष्टी परत मिळवून देण्यासाठी कॉर्निया जतन करण्यात आला आहे.