
एअर इंडिया कंपनी प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करते, असा आरोप सातत्याने केला जात आहे. विमानात असलेल्या खुर्च्या तुटलेल्या असतात, स्वच्छतेचा अभाव असतो, असे आरोप ताजे असतानाच आता दिल्ली विमानतळावर एका 82 वर्षीय वृद्ध महिलेला एअर इंडियाच्या प्रशासनाने व्हीलचेअर देण्यास नकार दिला. व्हीलचेअरसाठी एक तास वाट पाहिल्यानंतर त्या चालत गेल्या, परंतु अचानक त्यांचा तोल जाऊन त्या एअरलाइन काऊंटरजवळ खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
वृद्ध महिला खाली कोसळल्यानंतरसुद्धा तेथे उपस्थित असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याने मदत केली नाही, असा गंभीर आरोप महिलेच्या नातलगांनी केला आहे. गंभीर दुखापतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या आयसीयूत मृत्यूशी झुंज देत आहेत. दरम्यान, आम्हाला या घटनेबद्दल वाईट वाटते. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत, असे एअर इंडियाने म्हटले.
तिकिटावर व्हीलचेअर कन्फर्मेशन
दिल्लीहून बंगळुरूला एअर इंडियाची फ्लाइट बुक करण्यात आली होती. आजीसाठी विमानाच्या दारापर्यंत व्हीलचेअरची खास विनंती केली होती. तिकिटावर व्हीलचेअर कन्फर्मेशनदेखील मिळाले होते, पण जेव्हा ते टर्मिनल 3 वर पोहोचले तेव्हा तासभर वाट पाहिल्यानंतरसुद्धा एअर इंडियाकडून व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे आजीला गंभीर दुखापत झाली आहे, असा आरोप या महिलेची नात पारूल कंवर हिने केला आहे.