
फुटबॉल सामन्यादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. यावेळी जळते फटाके प्रेक्षकांच्या गॅलरीत उडाले. फटाके अंगावर आल्याने 30 प्रेक्षक भाजल्याची घटना मंगळवारी रात्री केरळमध्ये घडली. तीन जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेच्या समारोप समारंभात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे ही घटना घडली. युनायटेड एफसी नेल्लीकुथ आणि केएमजी मावूर यांच्यात अंतिम सामना होणार होता. स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती.
सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी जळते फटाके स्टेडियमच्या गॅलरीत पुढील रांगेत बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर उडाले. यामुळे काही जण भाजले तर काही जण स्वतःच्या बचावासाठी पळताना जखमी झाले. सर्व जखमींना इरोडमधील विविध रुग्णालयात नेण्यात आले. तर तीन गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.