
व्हेनेझुएला येथून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. हे शुल्क 2 एप्रिलपासून लागू होणार आहे. व्हेनेझुएलाला शासन करणे हाच यामागचा उद्देश असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
व्हेनेझुएला जाणूनबुजून आणि कपटाने गुन्हेगार तसेच हिंसक टोळ्यांना अमेरिकेत पाठवते. यात ट्रेन डी अरागुआ यांसारख्या दहशतवादी संघटनांचाही समावेश आहे. अशा गुन्हेगारांना आम्ही परत पाठवू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे रिलायन्ससारख्या काही हिंदुस्थानी कंपन्यांच्या अडचणी वाढू शकतात. रिलायन्स व्हेनेझुएलातून तब्बल 90 टक्के तेल खरेदी करते. डिसेंबर 2023 मध्ये हिंदुस्थानने व्हेनेझुएलातून रोज सुमारे 1,91,600 बॅरल कच्चे तेल आयात केले असून जानेवारी 2024 मध्ये हे प्रमाण रोज 2,54,000 बॅरलपर्यंत वाढवण्यात आले असे फायनान्शियल टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे.
हिंदुस्थानची दिवसाला 45 लाख बॅरल्सची आयात
हिंदुस्थानची कच्च्या तेलाची एकूण आयात ही 45 लाख बॅरल्स इतकी आहे. त्या तुलनेत व्हेनेझुएलाकडून हिंदुस्थानने 65 बॅरल्स दिवसाला तर जानेवारीत 93 हजार बॅरल्स प्रतिदिन इतके कच्चे तेल फेब्रुवारी महिन्यात आयात केले होते. परंतु, हिंदुस्थानातील कच्च्या तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मावळच्या आर्थिक वर्षाची रेकॉर्ड पातळी हिंदुस्थान लवकरच ओलांडू शकते. गेल्या वर्षी हिंदुस्थानने 87.7 टक्के कच्च्या तेलाची आयात केली. चालू आर्थिक वर्षात ती 88.2 टक्क्यांपर्यंत वाढली. त्यामुळे अमेरिकेच्या निर्णयाचा हिंदुस्थानच्या आयातीवरही परिणाम होऊ शकतो.