काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी तपास संस्थांचा वापर, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कपिल सिब्बल मोदी सरकारवर बरसले

भारत ही लोकशाहीची जननी आहे, असे दाखवले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात तुम्ही तर हुकूमशाहीचे जनक आहात. काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भाजप तपास संस्थांचा वापर करत आहे, अशा शब्दांत नॅशनल हेरॉल्डरवरील कारवाईप्रकरणी कपिल सिब्बल मोदी सरकारवर बरसले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने संबंधितांना स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासंबंधी बजावलेली नोटीस म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला.

मोदी सरकारला हिंदू-मुस्लिम मुद्दय़ावरून राजकारण करायचे असून विरोधकांना संपवायचे आहे, असे ते म्हणाले. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडीने सुमारे 661 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यात दिल्ली,  मुंबई, लखनौमधील नॅशनल हेरॉल्ड आणि असोसिएट जर्नल्स लिमिटेडच्या इमारती रिक्त करण्यास सांगण्यात आले आहेत परंतु, या इमारतींमध्ये काँग्रेसची कार्यालये असून ईडीच्या आडून कारवाईच्या नावाखाली काँग्रसला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला.

कारवाईसाठी 13 वर्षे का थांबलात?

काँग्रेसने असा काय गुन्हा केला आहे. कारवाईसाठी तब्बल 13 वर्षे का थांबलात? असा सवाल करतानाच पेंद्राला त्यांची संपत्ती हडप करायची आहे, असा आरोप सिब्बल यांनी केला आहे. देशभरात नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ज्या जागा रिक्त करण्यास सांगण्यात आल्या आहेत तिथे काँग्रेसची कार्यालयेदेखील आहेत. या जागा ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसला आपले कामकाज करण्यासाठी जागाच उरणार नाही. त्यामुळे काँग्रेस कमकुवत होईल, असा सरकारचा डाव असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला आहे