माजी अग्निवीरांसाठी गृह मंत्रालयाची मोठी घोषणा, CISF मध्ये मिळणार 10 टक्के आरक्षण

punjab border jawan

माजी अग्निवीरांसाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी माजी अग्नीविरांना निमलष्करी सेवेत घेण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. आता गृहमंत्रालयाने निमलष्करी दलात (सीआयएफ) माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के पदे आरक्षित राहतील, तसेच, त्यांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीच्या वयात सूट दिली जाईल, अशी माहिती गुरुवारी दिली. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार सीआयएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ आणि आरपीएफ सारख्या केंद्रीय दलात 10 टक्के पदे माजी अग्निवीर जवानांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह म्हणाल्या, ‘केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांच्या भरतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत CISF माजी अग्निवीरांच्या भरतीची प्रक्रियेचा आराखडा तयार करत आहे. भविष्यातील सर्व कॉन्स्टेबलच्या नियुक्त्यांमध्ये 10 टक्के नोकऱ्या माजी अग्निवीर जवानांसाठी राखीव ठेवल्या जातील. याशिवाय, त्यांना शारीरिक चाचण्यांमध्येही वयात सवलत दिली जाईल. पहिल्या तुकडीसाठी पाच वर्ष तर पुढच्या तुकड्यांसाठी तीन वर्षांची सुट दिली जाईल.

यासंदर्भात बीएसएफच्या महासंचालक नितीन अग्रवाल यांच्या म्हणण्यांनुसार, अग्निवीरांना चार वर्षांचा अनुभव आहे. ते शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित जवान आहेत. हे बीएसएफसाठी खूप चांगले आहे. त्यांच्या भरतीमुळे आम्हाला प्रशिक्षित सैनिक मिळत आहेत. थोड्या प्रशिक्षणानंतर  ते सीमेवर तैनात केले जातील. माजी अग्निवीरांच्या भरतीमुळे सर्व सुरक्षा दलांना फायदा होईल, असे ते म्हणाले. पुढे म्हणाले,  प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना सीमेवर तैनात केले जाईल. एकूण रिक्त पदांपैकी 10 टक्के जागा त्यांच्यासाठी राखीव असतील. त्यांच्यासाठी वयातही सवलत असेल.