77व्या पोलीस आमंत्रित ढाल स्पर्धेतील ब गटातील सलामीच्या लढतीत शनिवारी नॅशनल क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखाना संघावर 9 विकेट राखून विजय मिळवला.
नॅशनल सीसी, क्रॉस मैदान येथे झालेल्या सामन्यात, इस्लाम जिमखान्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा निर्णय त्यांच्यावरच उलटला. खिजर दाफेदारच्या (5/39) अचूक माऱयासमोर त्यांचा डाव 29.1 षटकांत अवघ्या 99 धावांवर आटोपला. इस्लाम जिमखान्याकडून अबुल खानने सर्वाधिक 31 धावा केल्या. नॅशनल क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्ध्याचे माफक आव्हान 18.4 षटकांत एका विकेटच्या बदल्यात पार केले.
मुंबई पोलीस जिमखाना येथे झालेल्या मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस जिमखान्याचे अध्यक्ष विवेक फणसाळकर यांच्या हस्ते 77व्या पोलीस आमंत्रित ढाल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी सह-आयुक्त (प्रशासन) आणि मुंबई पोलीस जिमखान्याचे उपाध्यक्ष एस. जयकुमार, डॉ. अभिनव देशमुख, मुंबई पोलीस जिमखान्याचे सचिव अनिल देशमुख, अभय हडप, संयुक्त-सचिव दीपक पाटील तसेच एमसीएचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.