
बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी शिवाजीनगर परिसरात मेट्रो ट्रॅकवर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल फेकल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना चोप देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली. या प्रकरणी १५ ते २० कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पक्षाने गंभीर दखल घेऊन कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी दुपारी दोनच्या सुमारास महापालिका मेट्रो स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. जाताना त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या होत्या. सोबत काही महिला कार्यकर्त्याही होत्या. त्यांनी थेट मेट्रो मार्गिकवर (ट्रॅक) उतरून आंदोलन सुरू केले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना हात जोडून करीत आंदोलन मागे घेण्याची तासभर विनंती केली. त्यांची समजूत काढून मेट्रो मार्गिकेवरून खाली या तोडगा काढू, असेही सांगितले. मात्र, आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते. तेवढ्यात पावटेकर आणि एक तरुण मार्गिकेवरील कठड्यावर चढले. तेथून ते कधीही तोल जाऊन खाली पडले असते. त्यामुळे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना फोन केला. मात्र, पावटेकर यांनी जगताप यांनाच शिवीगाळ करत ते आम्हाला पुढे येऊ देत नाही, असे म्हणत बोलण्यास नकार दिला.
परिस्थिती हाताबाहेर जात असताना पुन्हा एकदा पोलीस आंदोलकांच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा पावटेकर यांनी उपायुक्त गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकल्यामुळे पोलीस पथक गडबडले. गिल्ल यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांची गचांडी पकडत त्यांना मेट्रो स्थानकात सहकाऱ्यांच्या मदतीने ओढत नेले. उद्दामपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना चोप देत गाडीत बसवले. त्यानंतर सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आंदोलकांच्या झटापटीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या अंगावर फेकलेल्या पेट्रोलने पेट घेतला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी
■ नरेंद्र पावटेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कोणत्याच आंदोलनात आणि कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले. आंदोलनानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे, त्याचबरोबर पुणेकरांची अडवणूक निषेधार्ह आहे. आजचे त्यांचे आंदोलन हे वैयक्तिक असून, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता, त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
स्थानकाची सेवा दोन तास ठप्प
■ आंदोलक 2- 4 लोकांच्या गटांनी मेट्रो स्थानकात प्रवासी म्हणून आले आणि त्यांनी अचानक मेट्रो रुळांवर उड्या मारल्या. कार्यकर्ते पुणे मेट्रोच्या रूळांवर व बाजूच्या कठड्यांवर बसून आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान पुणे मेट्रोची पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट सेवा सुरळीत सुरू होती. रामवाडी ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ स्थानक ते छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो सुरू होती. दुपारी आंदोलनामुळे पीएमसी मेट्रो सेवा बंद ठेवली होती. पुणे मेट्रोकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याचे पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले