विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्यांकडून आत्महत्येचा दावा; पण 4 वर्षाच्या मुलीने चित्रातून उकलले आईच्या हत्येचे गूढ

उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका विवाहितेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. विवाहितेने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या सासरच्यांनी केला होता. मात्र मयत महिलेच्या चार वर्षाच्या मुलीने चित्र काढून आईच्या मृत्यूचे गूढ उकलले. मुलीने पोलिसांना चित्र काढून वडिलांनी आईला मारल्याचे दाखवले. मुलीच्या जबाबानंतर सर्वच हैराण झाले.

मुलीने पोलिसांना सांगितले की, पप्पांनी आधी मम्मीला मारले आणि मरायचे असेल तर मर असे बोलले. मग पप्पांनी तिला लटकवले आणि डोक्यात दगडाने मारले. मग मृतदेह खाली काढला आणि गोणीत भरून फेकला, असे मुलीने पोलिसांना सांगितले. मुलीने घटनेचे चित्र काढून पोलिसांना दाखवले.

पप्पांनी आधी मम्मीला मारण्याची धमकी दिली होती. मी त्याला एकदा सांगितले होते, तू माझ्या मम्मीला हात लावलास तर मी तुझा हात तोडेन. तो तिला मारहाण करायचा आणि मर म्हणायचा. माझेही तिच्यासारखे हाल होतील म्हणायचा, असे मुलीने पुढे सांगितले.

झाशीच्या कोतवाली परिसरात पंचवटी शिव परिवार कॉलनीत राहणाऱ्या सोनाली बुधोलिया ही महिला सोमवारी मृतावस्थेत आढळली होती. यानंतर सासरच्यांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला. मात्र सोनालीची चार वर्षाची मुलगी दर्शिताने दिलेल्या जबाबावरून आणि तिने काढलेल्या चित्रावरून सोनालीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले. संदिप बुधेलिया असे आरोपी पतीचे नाव असून तो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.

सोनालीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिपचे 2019 मध्ये त्यांच्या मुलीशी लग्न झाले होते. लग्नात संदिपच्या घरच्यांना 20 लाख रोकड हुंडा म्हणून दिली होती. मात्र तरीही लग्नानंतर त्यांची मागणी वाढू लागली. माहेरुन कार आणण्यासाठी ते सोनालीला छळत होते. अखेर सोनालीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तडजोड करण्यात आली.

सोनालीच्या प्रसुतीनंतर पुन्हा तिचा छळ सुरू झाला. सासरच्या लोकांना मुलगा हवा होता, मात्र सोनालीला मुलगी झाली. सोनाली झांशीला तिच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेली असता पतीने तिला कॉल करून घरी बोलावले. त्यानंतर सोमवारी तिच्या वडिलांना फोन करून तिची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा फोन करून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसात सोनालीच्या पालकांनी तिची हत्या केल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे. सोनालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले.