दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते 18 ऑक्टोबर 1965 रोजी स्थापलेल्या कोनशिलेचे जलसंपदा प्रशासनाने पूजन केले. अन् ‘जायकवाडी’ चा 59 वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा केला. मराठवाड्याला जलसंजीवनी देणारा ‘नाथसागर’ साठीला पोहोचला आहे. तथापि, धरणातील गाळाची समस्या मात्र ऐरणीवर आली असून, प्रकल्पाच्या 100 वर्षांच्या संकल्पित आयुष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषिसिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्याची उपयुक्तताच या गाळात रुतण्याची साधार भीती व्यक्त केली जात आहे.
यांच्या हस्ते भूमिपूजन करून पैठणचे भूमिपुत्र कै. शंकरराव चव्हाण यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या या भव्य प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. 18 ऑक्टोबर रोजी या ऐतिहासिक घटनेला 59 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘कडा’ चे प्रशासक समाधान सब्बीरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वर्धापनदिन कार्यक्रमात कोनशिलेचे पूजन करण्यात आले.
कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे, ‘कडा’चे उपप्रशासक दीपक डोंगरे, सेवानिवृत्त कर्मचारी शकुंतला आवारे, शाखा अभियंता तुषार विसपुते व दादासाहेब पठाडे उपस्थित होते.
दरम्यान, 100 वर्षांचे संकल्पित आयुष्य असलेल्या ‘नाथसागरा’त गाळांचे डोंगरच्या डोंगर उभे राहात आहेत ! एकीकडे जायकवाडीची उपयुक्तताच गाळात रुतण्याची भीती आहे, तर दुसरीकडे संकल्पित आयुष्य घटून प्रकल्प निकामी होण्याचा धोकाही वाढला आहे. नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने 1995 साली प्रथमच उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्याचा प्रयोग राबवण्यात आला होता.
जलाशयातील वाढत्या गाळामुळे उपयुक्त जलसंचय क्षमता 10 टक्क्यांनी कमी झाल्याचा अहवाल त्यावेळी देण्यात आला होता. 29 वर्षांपूर्वीची ही स्थिती आहे. 1972 पासून धरणात पाणी साठायला सुरुवात झाली. त्यामुळे नाथसागराचे वय 42 वर्षे झाल्याचे गृहीत धरले तरी संकल्पित 100 वर्षांचे आयुष्य या प्रकल्पाला लाभणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण पाणीवहन प्रक्रियेमध्ये गाळाचे वाहून येणे हे नैसर्गिक असले तरी प्रकल्पाची उभारणी करताना गाळप्रतिबंधक यंत्रणा उभारली जाते. धरणाच्या मूळ आराखड्यातच त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. जायकवाडीसाठीही उपाय योजण्यात आले होते. मात्र नाथसागरचे उथळ पाणलोटक्षेत्र व काठालगत वाढत जाणारे शहरीकरण मुळावर आले. ते रोखण्यासाठी पाणपसाऱ्या भोवती व काठांवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आवश्यक होते. तसे करण्यात आले नाही. नाथसागरचे पाणलोटक्षेत्र प्रचंड विस्तारलेले आहे. वरच्या भागात दारणा, कडवा, मुळा, प्रवरा, नारंगी, गुल, अगस्ती, , भाम, भांबली, मुकनी, कश्यपी, शिवना व लेंडी या गोदावरीच्या उपनद्या आहेत. भूस्तराचे स्वरूप मैलागणिक बदलत गेल्यामुळे या उपनद्यांना हजारो नाले येऊन मिळतात. ते सर्व पाणी नाथसागरात येते. या जलप्रवाहासोबत प्रचंड प्रमाणावर गाळांचे डोंगरसुद्धा येतच असतात. गोदावरी नदीच्या उगमापासून ते थेट नांदूर मधमेश्वर गोदावरी खोरे या दरम्यान तब्बल 4 हजार १७३ चौरस मैलांचे अंतर आहे. आणि हा सर्व नाथसागरच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे!
‘साउंड मेथड’ची गाळमोजणी पद्धत सदोष अन् क्लिष्ट
काळात लाखो टन गाळ वाहून आलेला आहे. नाशिक भागात झालेली अतिवृष्टी व अनेक महापूर नाथसागराने आपल्या महाकाय पोटात सामावून घेतले आहेत. धरणाच्या पाणीसाठवण क्षमतेपेक्षा कित्येत पट अधिक पाणी प्रकल्पाच्या 27 दरवाजांद्वारे गोदावरीत पुढे नांदेडपर्यंत सोडावे लागले आहे. महापुराच्या रूपात जीवनरुपी पाणी संकट बनून आले व पुढे गेले. परंतु त्याच्यासोबत आलेला गाळ मात्र आगामी संकटाच्या रुपात धरणातच रुतून बसलेला आहे. गाळाचे मोजमाप करणारी अद्ययावत यंत्रणाच नसल्यामुळे हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. पाटबंधारे तज्ज्ञ आपल्या पद्धतीने गाळाची मोजणी करतात. ‘साऊंड-मेथड’ नावाचे तंत्र पारंपरिक समजले जाते. जलपृष्ठभागावर एक होडी स्थिर केली जाते. वजन लटकवलेली दोरी विशिष्ट यंत्राद्वारे जलाशयात सोडली जाते. दोरी पाण्याखालच्या भूभागापर्यंत टेकल्यानंतर उंची मोजून निष्कर्ष काढला जातो. त्यानंतर केलेल्या फेरमोजणीत आढळणारा फरक म्हणजेच गाळाचा नवा (ताजा) थर मानला जातो. अत्यंत क्लिष्ट व सदोष असलेली ही पद्धत नाथसागराचा आवाका लक्षात घेऊन कधीच वापरली गेली नाही, हे विशेष !
‘रिमोट सेन्सिंग ‘चे तंत्र …
दुसरे तंत्र दूरसंवेदन तंत्र (रिमोट सेन्सिंग) या नावाने ओळखले जाते. 1976 ते 1992 या कालावधीत नाथसागरासाठी हे तंत्र वापरून गाळाचे मोजमाप घेण्यात आले होते. जलाशयाची विरोध पाणी पातळी पृष्ठता गृहित धरून जलविस्ताराची छायाचित्रे उपग्रहाच्या सहाय्याने काढण्यात आली होती. प्रतिवर्षी हा प्रयोग करण्यात आला. वर्षागणिक वाढलेला जलविस्तार दिसून आला. म्हणजेच पाणी तेवढेच, मात्र फुगवटा वाढला. अर्थात गाळाचे प्रमाण जास्त झाले, असा निष्कर्ष काढण्यात आला. गाळ मोजणीच्या 46 वर्षांपूर्वी झालेल्या या ‘हायटेक’ प्रयोगाचा अहवालही त्यावेळी जाहीर करण्यात आला होता. पाणी वापरावर ‘गाळाच्या डोंगराएवढे’ प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पाणी वापरावर गाळाच्या डोंगराएवढे प्रश्नचिन्ह
नाथसागरमधील गाळाचे संशोधन व सर्वेक्षण करणाऱ्या 2 तज्ज्ञ संस्था आहेत. ऊर्जा संशोधन केंद्र (पुणे) व महाराष्ट्र अभियांत्रिकी संस्था अर्थात ‘मेरी’ (नाशिक). त्यांचेही संशोधन झाले आहे. परंतु उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. तंत्रज्ञानाच्या प्रगत युगामध्ये गाळाचे नेमके मोजमाप करणे फारसे अवघड नाही. त्याचा गांभीर्याने विचार करावा. कारण धरणाच्या प्रचंड अशा पाणपसाऱ्यामध्ये कागदोपत्री पाणीसाठा किती ? व त्याखाली साठलेला गाळ किती ? गाळामुळे जलसंचय नाममात्र असण्याची साधार शक्यता आहे. गाळाच्या मोजमापाची मोहीमच राबवायला हवी. हजारो हेक्टर्स सिंचन करणाऱ्या धरणातील पाण्यावर 258 गावातील जवळपास 55 लाख लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. 7 औद्योगिक परिसर व 13 साखर कारखान्यांना अहोरात्र पाणी पुरवले जात आहे. पाणी किती अन् गाळ किती ? याचा उलगडा होत नाही तोपर्यंत नाथसागरची उपयुक्तता गाळातच रुतलेली राहणार आहे. कारण सध्यातरी धरणाच्या पाणी वापरावर गाळाच्या डोंगराएवढेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.