नाशिकच्या तरुणाचे मंत्रालयाबाहेर झाडावर चढून आंदोलन

महायुती सरकारच्या काळात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. भ्रष्टाचार करणाऱयांच्या विरोधात सर्व पातळय़ांवर तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या नाशिकमधील तरुणाने मंत्रालयाच्या बाहेरील झाडावर चढून आज अनोखे आंदोलन पुकारले. अखेर पोलिसांनी या तरुणाला शांत करून झाडावरून खाली उतरवले आणि ताब्यात घेतले.

मंत्रालयात सध्या प्रवेशावर निर्बंध आणले आहेत. मंत्रालयात प्रवेश मिळणे कठीण झाल्यामुळे पावणेचारच्या सुमारास नाशिकच्या गिरणानगरमधील सुनील सोनवणे मंत्रालयाच्या मुख्य गेटच्या बाहेर असलेल्या बदामाच्या झाडावर चढला आणि बॅनर फडकवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी झाडाला चारही बाजून घेरले. काही मिनिटांतच बघ्यांची गर्दी वाढली. पोलिसांचा फौजफाटा बघताच सुनील सोनावणे झाडाच्या आणखीन वरच्या फांदीवर चढला.