कोपरगावला पुन्हा 10 दिवसांआड पाणी

नाशिक धरण परीक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने तसेच बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणी कमी होत आहे. नाशिकच्या एकूण 23 धरणांत केवळ 2759.01 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, कोपरगाव शहराला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आठ दिवसाऐवजी दहा दिवसाआड केला जाणार आहे.

पालिकेच्यावतीने शहरात राहणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की, धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाटबंधारे विभागामार्फत पाणी काटकसरीने वापरण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. डाव्या कालव्याद्वारे येणारे आवर्तन उशिरा सोडणार असल्यामुळे पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा 10 दिवसाआड येत आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व विंधन विहिरीचा पाण्यासाठी वापर करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठ्यावरच दिवस काढावे लागणार आहेत. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. आज नाशिक येथील धरणांमध्ये 5.47 टक्के पाणीसाठा आहे.

1 जूनपासून फक्त 103 मि.मी. पाऊस

एक जूनपासून कोपरगावला 103 मि.मी., ब्राह्मणगावला 138, पढेगाव 25, शिर्डीला 119, राहाता 117, नाशिकला 186 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे खात्याने केली आहे. तर, चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घोटी इगतपुरीला पाऊस शून्य टक्के आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 1283 क्युसेस पाणी वाहून गेले आहे.