‘रोठे एर्डे इंडिया’मध्ये ऐतिहासिक पगारवाढ, कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

नाशिकच्या रोठे एर्डे इंडिया प्रा.लि.च्या (बेरिंग डिव्हिजन’ कामगारांना भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे ऐतिहासिक पगारवाढ मिळाली आहे. यामुळे 75 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या पगारवाढीसाठी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस प्रकाश नाईक व युनिट कमिटीने व्यवस्थापनासोबत ऐतिहासिक करार केला.

या करारामुळे कामगारांच्या पगारात एकूण 20,301/- वाढ (सीटीसी) झाली असून या पगारवाढीनंतर कामगारांचा एकत्रित पगार किमान 70,000/- ते कमाल रु. 75,000/- होणार आहे.

याव्यतिरिक्त महागाई भत्ता 2,600/-, वार्षिक बोनस रु. 70,000/-, पेट्रोल भत्ता, मेडिक्लेम, प्रोडक्शन इन्सेन्टिव्ह, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7 लाखांची तरतूद, मृत्यू सहाय्य निधीपोटी 28 लाख रुपये आदी सुविधा कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक करारावर भारतीय कामगार सेनेकडून शिवसेना नेते, खासदार, अध्यक्ष अरविंद सावंत, चिटणीस प्रकाश नाईक यांनी तर पंपनीकडून सर्वेश वर्मा, विनय सावंत, उमेश कुलकर्णी, मंदार पाराशरे, युनिट कमिटीकडून यू. अध्यक्ष सचिन ढोली, सरचिटणीस केतन चौधरी, उपाध्यक्ष अमोल बोरसे, चिटणीस दिनेश काटे व खजिनदार पंकज पाटील यांनी सह्या केल्या.