
‘मी शिवसेनेसोबतच का?’ या चर्चासत्रात बोलताना शिवसेना उपनेते अद्वय हिरे. यात एकलव्य संघटनेचे पदाधिकारी शिवाजी ढवळे, शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर, माजी महापौर वसंत गीते यांनीही मनोगत मांडले.
महाराष्ट्रात भयंकर असे सूडाचे राजकारण सुरू आहे, दबावतंत्र वापरून विरोधकांचा, त्यांच्या पुटुंबीयांचा सत्ताधारी छळ करीत आहेत, अशा परिस्थितीतही न डगमगता शिवसेना या चार अक्षरांशी प्रामाणिक राहून, आपले दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कडवट शिवसैनिक लढतो आहे, विविध संघटना सोबत आहेत. त्यापैकीच एकलव्य संघटनेचे पदाधिकारी शिवाजीराव ढवळे, शिवसेना नेते अद्वय हिरे, सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते यांनी ‘मी शिवसेनेसोबतच का?’ या चर्चासत्रात सहभाग नोंदवला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि मुलाखतकार किरण खोत यांच्या प्रश्नांना उत्तरे देत शिवसेनेवरील अपार प्रेमाचे आणि अतूट विश्वासाचे नाते उलगडले.
हिंदुस्थानच्या या स्वातंत्र्य लढ्यातून हटणार नाही – अद्वय हिरे
सत्ताधाऱयांच्या हुपूमशाहीविरोधात हिंदुस्थानात दुसरा स्वातंत्र्य लढा सुरू असून स्वातंत्र्यसैनिक होण्याची हीच वेळ आहे, देशाला पुन्हा स्वतंत्र करण्यासाठीच मी शिवसेनेत आहे, असा ठाम विश्वास शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी व्यक्त केला. निवडणुकीतील पराभव दिसू लागल्याने सत्ताधाऱयांनी दबावतंत्र अवलंबून माझ्यावर गुन्हा दाखल केला, मी तुरुंगात गेलो पण झुकलो नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी माझे आजोबा भाऊसाहेब हिरे यांनी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. मुंबई जिंकायची तर शिवसेनेला संकटात आणावेच लागेल, ही भाजपाची कूटनीती आहे. आज भाऊसाहेब हिरे असते, तर त्यांनी मुंबई वाचवण्यासाठी शिवसेनेला साथ दिलीच असती, त्यामुळेच मी शिवसेनेसोबत आहे. जन्माला आल्यापासून सत्ता पाहतो आहे, तिचा मोह नाही, पराभवाची चिंता नाही, असे सांगून लढत राहणारच, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
मी लढणारा शिवसैनिक – वसंत गीते
शिवसेना पक्षातच संकटांशी लढण्याची ताकद आहे आणि याच शिवसेनेचा मी एक लढणारा शिवसैनिक आहे, माझ्यासाठी पद हा विषय महत्त्वाचा नाही, अशा शब्दांत माजी आमदार वसंत गीते यांनी पक्षासोबतचे नाते उलगडले. मला सन 1966ची शिवसेना परत पाहिजे, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यावेळी तुम्ही ज्यांना जबाबदारी द्याल, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीन, असा मी शब्द दिला. विधानसभा निवडणुकीत मला 92 हजार मते मिळाली, ती शिवसेनेमुळेच मिळाली, हे लक्षात घेवून मी पुढील वाटचाल करीत आहे, असे ते म्हणाले. नव्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल, असा प्रश्न शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला असता वसंत गीते म्हणाले की, आमच्यासोबत तरुण आणि महिलांनी पक्ष वाढवण्यासाठी पुढे आले पाहिजे, जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पंचवीस वर्ष आपण ज्यांच्यासोबत होतो, ज्यांना वाढवले, त्यांनीच घात केला, हे लक्षात ठेवून आता प्रत्येकाने फक्त आपल्या शिवसेनेसाठी भरीव योगदान दिले पाहिजे, असे आवाहन केले.
यापुढेही संकटं सहन करेन – सुधाकर बडगुजर
मी संकटांना संधी समजून काम करीत आलो आहे, यापुढेही संकटं सहन करीन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या आदेशाने काम करीत राहीन, अशी ग्वाही शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी दिली. सन 2007मध्ये पहिल्यांदा मी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यावेळी सत्ताधाऱयांसोबत न जाता शिवसेनेत आलो. कोरोना काळात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी, जनतेत जागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरलो, गल्लोगल्ली फिरलो असेही त्यांनी सांगितले.
सदैव शिवसेनेसोबत – शिवाजीराव ढवळे
प्रस्थापितांविरुद्ध लढणाऱया शिवसेनेकडून आम्हाला भरपूर प्रेम मिळाले, आम्ही सत्तेचे लोभी नाही, म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी मीही म्हाडा अध्यक्ष पद सोडले, अशी आठवण एकलव्य संघटनेचे पदाधिकारी शिवाजीराव ढवळे यांनी सांगितली. ओठात एक पोटात एक असं नेतृत्व आम्हाला मान्यच नाही, शिवसेनेसोबत नमकहरामी कधीही करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत सदैव शिवसेनेसोबतच राहीन, अशी ग्वाही ढवळे यांनी दिली.