मुंबईहून नांदेडला जाणारी एक्स्प्रेस मनमाड स्थानकाजवळ 700 मीटर रिव्हर्स घेण्यात आली. याला निमित्त होते ते रेल्वेतून खाली पडलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्याचे. एक प्रवासी खाली पडल्याचे कळताच सहप्रवाशांनी एक्स्प्रेसमधील ‘अलार्म साखळी’ खेचली आणि मोटरमनला एक्स्प्रेस थांबवण्यास भाग पाडले. त्यावर मोटरमन केवळ एक्स्प्रेस थांबवण्यावर शांत बसला नाही तर जखमी प्रवाशाला वाचविण्यासाठी तातडीने प्रसंगावधान दाखवत एक्सप्रेस रिव्हर्स घेण्यात आली. रेल्वेच्या इतिहासात एका प्रवाशाचा प्राण वाचविण्यासाठी एक्सप्रेस मागे घेण्यात आल्याची ही पहिली घटना घडली आहे.
सरवर शेख असे मृत प्रवाशाचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. मनमाड स्थानकाजवळ तो ट्रेनमधून पडला. त्यानंतर अन्य प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली. तिसऱ्या डब्यातून एक व्यक्ती पडल्याचे रेल्वे गार्ड एस एस कदम यांना प्रवाशांकडून समजले. यानंतर कदम यांनी लोको पायलट एम एस आलम यांच्याशी संपर्क साधला. लोको पायलटने नियंत्रकाशी संपर्क साधून ट्रेन रिव्हर्स चालवण्याची परवानगी मागितली.
तपोवन एक्स्प्रेसच्या मागे धावणारी एक मालगाडी आधीच्या स्थानकावर थांबवून तपोवन एक्स्प्रेसला रिव्हर्स जाण्याची परवानगी देण्यात आली. सहप्रवाशांनी जखमी व्यक्तीला शोधून ट्रेनमध्ये ठेवले. त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनकडे रवाना झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करत तात्काळ जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेले. यानंतर तपोवन एक्स्प्रेस नांदेडच्या दिशेने रवाना झाली.