पाकिस्तानच्या आयएसआयला गोपनीय माहिती विकणाऱ्या नाईक संदीप सिंग या लष्करी जवानाला अटक करण्यात आली आहे. अवघ्या पंधरा लाखात त्याने मोबाईल फोनवरून आयएसआयला लष्करी महत्त्वाची माहिती दिल्याचे उघड झाले.
संदीप सिंग 2015 पासून हिंदुस्थानी लष्करात आहे. सध्या त्याची पोस्टिंग नाशिक येथील आर्मी कँटोन्मेंटमध्ये होती. मागील दोन वर्षांत संदीप सिंगने नाशिक, जम्मू, पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांचे फोडो, शस्त्रास्त्रांची माहिती आणि अधिकाऱयांच्या तैनातीची माहिती आयएसआयला व्हॉट्सअॅपवरून पाठवली होती. त्यासाठी त्याला विविध ठिकाणांहून पंधरा लाख रुपये मिळाले, अशी माहिती एसएसपी चरणजित सिंह सोहल आणि एसपी हरिंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संदीप सिंग काही दिवसांपूर्वी रजेवर गेला होता. तो पंजाबच्या पटियाला येथे गेला होता. तिथे घरिंडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. त्यातून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.