प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा करणार, त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी 1100 कोटींची योजना

सिंहस्थासाठी प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये सन 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा नियोजन व विकासकामांचा आढावा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन कुशावर्ततीर्थ कुंडाची व परिसराची पाहणी करून माहिती घेतली, विविध सूचना दिल्या. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण करून त्यासाठी स्वतंत्र कायदा केला. त्याच धर्तीवर नाशिक, त्र्यंबकेश्वरलाही अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्र्यंबकेश्वरसाठी अकराशे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ही कामे जलदगतीने कालबद्धरीत्या पूर्ण करण्यात येतील. नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये साधुग्रामसाठी जागा संपादित करण्यात येतील, नदीघाट विकसित करण्यात येतील. गोदावरी प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. सिंहस्थ प्राधिकरणात फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचाच समावेश असेल. त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येईल. सिंहस्थासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

नाशिक, रायगडचा सध्या मीच पालक

जोपर्यंत पालकमंत्री नियुक्त होत नाही, तोपर्यंत त्या जिह्याचे पालकमंत्री हे मुख्यमंत्रीच असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या युवा उद्योजकांशी ते बोलत होते. या जिह्यांना पालकमंत्री देऊ, असे त्यांनी सांगितले असले तरी या दोन्ही जिह्यांचा हा तिढा केव्हा सुटेल हे मात्र अनिश्चित आहे.