लहान मुलं काय करतील याचा नेम नाही. यामुळेच लहान मुलांची विशेष लक्ष घेण्याची आवश्यकता आहे. अशीच घटना नाशिकमधील मनमाड तालुक्यात उघडकीस आली आहे. खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने विक्सची डबी गिळली. ही डबी चिमुकल्याच्या घशात अडकल्याने चिमुकल्याचा जीव गुदमरायला लागला. मात्र डॉक्टरांनी देवदूत बनले आणि चिमुकल्याला जीवदान मिळाले.
मनमाडच्या पानेवाडी गावात सागर काकड यांचा एक वर्षाचा मुलगा विक्सची डबी हातात घेऊन खेळत होता. खेळता खेळता चिमुकल्याने हातातील विक्सची डबी तोंडात टाकली आणि गिळली. यामुळे डबी घशात अडकली.
डबी घशात अकडल्याने चिमुकल्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. पालकांनी डबी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर पालकांनी चिमुकल्याला देवकी हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमधील डॉ. राजपूत यांनी शर्थीचे प्रयत्न केले अन् घशात अडकलेली विक्सची डबी बाहेर काढली. डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे चिमुकल्याचा जीव वाचला आहे.