अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले; जमावाच्या दगडफेकीत 31 पोलीस जखमी

काठे गल्लीतील धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम न हटवल्याने मंगळवारी रात्री महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. जमावाने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या दगडफेकीत 31 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. दगडफेक प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत 14 जणांना ताब्यात घेतले आहे.

महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत असलेल्या काठे गल्लीतील धार्मिक स्थळाला न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस बजावली होती. त्यांनी मुदतीत अतिक्रमण काढले नाही. मंगळवारी रात्री अकरा वाजता ते हटवण्याची तयारी दर्शवत धार्मिक विधी पार पाडले. या वेळी पोलीस अधिकारी, ट्रस्टी उपस्थित होते. अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात होता. हे काम साडेअकराला सुरू झाले. काही वेळातच धार्मिक स्थळ पाडल्याची अफवा पसरली आणि उस्मानिया चौकाच्या बाजूने आलेला जमाव आक्रमक झाला, त्याने पुणाचेही न ऐकता पोलिसांसह ट्रस्टींवरही दगडफेक सुरू केली. यात 31 पोलीस जखमी झाले, वाहनांचेही नुकसान झाले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य बळाचा वापर करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना पांगवण्यात आले. संशयितांच्या 57 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.