नाशिकमध्ये भाजपाचा सत्ताबाजार, अजित पवार गट फोडला; बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरुद्ध अविश्वास दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक नाशिक बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरुद्ध भाजपाचे शिवाजी चुंबळे यांच्या नेतृत्वाखालील संचालकांनी सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला. त्याच्या मंजुरीसाठी 11 मार्चला बैठक बोलविण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्येकी पन्नास लाख रुपये देवून आणि सिंहस्थात प्रत्येकी पाच कोटींची कामे देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. पोलीस बळाचा वापर करून संचालक फोडण्यात आल्याचा आरोप देवीदास पिंगळे यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी खासदार देवीदास पिंगळे हे नाशिक बाजार समितीचे सभापती आहेत. अडीच हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या बाजार समितीत नेहमीच सत्ताबाजार भरतो. पिंगळे यांचे कट्टर विरोधक शिवाजी चुंबळे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी पहिला झटका पिंगळे यांना दिला आहे. अठरापैकी स्वतःसह पंधरा संचालकांच्या सह्यांचा पिंगळे यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे दाखल केला. यात बहुतांश संचालक हे अजित पवार गटाचे आहेत. दोन सदस्य हे मिंधे गटाचे आहेत. सत्ताधाऱयांमधील सत्ताबाजाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रत्येकी पन्नास लाख रोख, पाच कोटींचे ठेके – पिंगळे

स्वतःला नाशिकचे पालकमंत्री समजणारे गिरीष महाजन यांनी हा घात केला आहे. प्रत्येक सदस्याला पन्नास लाख रुपये देण्यात आले आहेत. सिंहस्थात प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या कामांचे ठेके देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात या संचालकांना जिल्हाधिकाऱयांकडे नेण्यात आले, ‘महाजन बोले अन् दल हले’ अशी ही स्थिती आहे, असा खळबळजनक आरोप देवीदास पिंगळे यांनी केला. सत्ताधारी पक्षानेच सहकारी गट पह्डण्याचे हे कृत्य योग्य नाही. अजित पवार यांना याबाबत माहिती दिली आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहेत, असेही पिंगळे यांनी स्पष्ट केले.