
गंगापूर रस्त्यावर बारदान फाटा येथे मंगळवारी सायंकाळी भरधाव कारच्या धडकेत महिला ठार झाली. मद्यपी कारचालकाला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
बारदान फाटा येथील मिसळच्या हॉटेलमधील काम आटोपून अर्चना किशोर शिंदे (31) या शिवाजीनगर येथे घराकडे जात होत्या. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारुती अल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर न थांबताच कारचालक फरार झाला. सीसीटीव्हीत ही घटना चित्रीत झाली. रस्त्याने जाणार्या नागरिकांनी शिंदे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नागरिकांनी दिलेल्या कारच्या नंबरवरून पोलिसांनी कार चालकाचा पत्ता शोधला. देवचंद रामु तिदमे याला ध्रुवनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. मद्याच्या नशेत त्याने सुसाट कार चालवून हा अपघात केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.