गेल्या काही दिवसांपासून कांदाभाव कोसळत आहेत, त्याच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सोमवारी लासलगाव आणि विंचूरमध्ये लिलाव बंद पाडले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्वरित 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निर्यात शुल्क लादून केंद्र सरकारने अघोषित निर्यातबंदी धोरण अवलंबिले आहे. यामुळे नाशिक जिह्यात दिवसेंदिवस कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत कांदाभाव प्रतिक्विंटल हजार रुपयांनी घसरले आहेत. थोडय़ा प्रमाणात दोन हजारच्या पुढे भाव मिळतो, मोठ्या प्रमाणात मात्र हजार-दीड हजार रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर आहे. यातून उत्पादन खर्चही सुटत नाही. आर्थिक कोंडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोमवारी सकाळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आक्रमक झाले. लासलगाव बाजार समिती आणि विंचूर उपआवारात सुरू असलेले लिलाव त्यांनी बंद पाडले.
कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, निर्यात शुल्क मागे घ्या, अशा घोषणा देत निदर्शने केली. अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. बाजार समिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली, आपल्या मागण्या सरकारला कळविण्यात येतील, असे आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. लिलाव पूर्ववत सुरू झाल्यानंतर शनिवारच्या तुलनेत सरासरी भावात काहीशी सुधारणा झाली. या आंदोलनात केदारनाथ नवले, विलास गांगुर्डे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
संक्रांतीमुळे लिलाव बंद
भोगी, संक्रांत व करी सणानिमित्त आजपासून तीन दिवस येवला, देवळा, उमराणा बाजार समिती, तर मुंगसे उपबाजार आवारात लिलाव बंद आहेत. मालेगाव, कळवण, चांदवड येथे मंगळवारी व बुधवारी लिलाव होणार नाहीत.