
राज्यभरात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना तसेच त्यांच्या कुटुंबांना दिलेल्या सर्व कागदपत्राची पडताळणी सुरू असून आज नाशिक विभागीय आयुक्तांना त्याचा अहवाल जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्रे अधिकृत आहेत की नाही, याचा कागदोपत्री अहवाल हा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती नगर जिल्हा शैल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी दिली. पूजा खेडकर व त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून गोपनीय माहिती ही सरकारने मागवलेली आहे. राज्य सरकारच्या प्रशिक्षण खात्याने ही माहिती एकत्रितपणे देण्याचा आदेश दिल्यानंतर येथील जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून संबंधित विभागांमध्ये त्याची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे यामध्ये इन्कम टॅक्स, महावितरण, प्रांत कार्यालय, ध्वनी प्रदूषण मंडळ आदी विभागाकडून माहिती मागवलेली आहे तसेच जिल्हा रुग्णालयातून जे सर्टिफिकेट दिलेले आहे त्याची माहिती सुद्धा घेण्यात आलेली आहे.
या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आम्ही जी महत्त्वाची माहिती शासनाने सांगितलेली आहे. त्यानुसार चार विभागांकडून आम्ही ही माहिती घेत आहोत. आज दुपारपर्यंत ज्या विभागांची माहिती उपलब्ध झाल्यानंतर एकत्रितपणे माहिती ही नाशिक विभागीय आयुक्त यांना आज सादर केली जाईल असेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले नेमकी कागदपत्रे कशा पद्धतीचे आहे यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
या प्रमाणपत्रांबाबत नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बैठक घेतली.
2018 मध्ये खेडकर यांना प्रमाणपत्र देणारे तत्कालीन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दर्शना धोंडे यांच्यासह सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी चर्चा केली होती.