नाशिकमध्ये रंगपंचमीला गालबोट; दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, मृतांपैकी एक अजित पवार गटाचा पदाधिकारी

बुधवारी राज्यभरात रंगपंचमी उत्साहात साजरी होत असताना नाशिकमध्ये मात्र या सणाला गालबोट लागले. उपनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या आंबेडकरवाडीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत. मृतांपैकी उमेश जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष होता. तो आणि त्याचा सख्खा भाऊ प्रशांत हे दोघेही बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या आंबेडकरवाडीतील एका सार्वजनिक शौचालयासमोरून जात होते. यावेळी शौचालयाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने सपासप वार केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांना प्रतिकारही करता आला नाही. कोयत्याच्या वारामुळे दोघेही जाग्यावरच कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही बाब परिसरातील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांनाही तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ऐन रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके रवाना केली आहेत.