नाशिकच्या सराईत साखळीचोरास नगरमध्ये अटक; 50 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

नाशिक येथून येऊन नगर शहरासह लोणी, संगमनेर परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईतास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विनोद गंगाराम पवार (वय 40, रा. सिडको झोपडपट्टी, नाशिक) असे सराईताचे नाव असून, त्याच्याकडून तीन लाख 55 हजारांचे 50 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

फिर्यादी कल्पना गांगुर्डे (रा. रेणावीकरनगर) या 21 जूनला रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करीत 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले होते. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर तपास करीत असताना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ही चोरी विनोद पवार याने केल्याचे उघड झाले होते.

विनोद पवार याचा शोध घेत असताना तो शहरातील तारकपूर बस स्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने त्याचा साथीदार किशोर धोत्रे याच्या साथीने दुचाकीवर येऊन मागील महिन्यात संगमनेर, लोणी व नगर शहरातील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार धोत्रे फरार आहे. दोघांनी केलेले चार गुन्हे उघडकीस आले असून, चोरी केलेले दागिने राहाता येथील सोनाराकडे विकल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने सोनाराकडून 50 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. सराईत पवार याच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, हेमंत थोरात, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.